
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तहसीलदारांना निवेदन; श्रीसंत एकनाथ महाराज पालखी मार्ग, गटार, शौचालय, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनातील अनियमिततेवर नागरिकांचा आक्रोशपरंडा (प्रतिनिधी):परंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या प्रशासन काळातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी परंडा शहरात 100% बंद पाळण्यात आला.

या पार्श्वभूमीवर ‘भ्रष्टाचार कृती समिती परंडा’ यांच्यावतीने तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, श्रीसंत एकनाथ महाराज पालखी मार्गाचा रस्ता विनाकारण फोडण्यात आला, तसेच कासीमबाग भागात सार्वजनिक शौचालय चार वर्षांपासून बंद आहे. शहरातील सिमेंट रस्ते आणि गटार योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे निदर्शनास आले आहे. गटारीच्या मधोमध विद्युत डीपी आणि ऑनलाईन कनेक्शन असल्याच्या परिस्थितीत कामे करण्यात आली, जी धोकादायक ठरू शकतात.स्वामी समर्थ नगरमधील अंतर्गत रस्ते तीन महिन्यांपासून खोदून तसेचच ठेवले आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिकचे डबे फक्त फोटोसाठी दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात ते नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनासाठी 15 लाख रुपयांची निविदा काढूनही प्रत्यक्षात केवळ 10 मजूर आणि एक गाडी वापरण्यात येत असल्याने निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.शहराच्या पाणीपुरवठ्याची स्थिती अतिशय गंभीर असून उशाला धरण जवळ असूनही अनेक वसाहतींना स्वच्छ आणि नियमित पाणी मिळत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.या निवेदनावर शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, अॅड. संदीप पाटील, श्रीहरी नाईकवाडी, नसिर शहाबर्फीवाले, इस्माईल कुरेशी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, शहरप्रमुख रईस मुजावर, तसेच अनेक माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परंडा शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते, आणि नागरिकांनी एकजूट दाखवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.