
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव नगर परिषदेच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून शहरातील पात्र दिव्यांग नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.शासन आदेशानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिव्यांग नागरिकांच्या विकास, सहाय्य आणि उपक्रमांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांच्या सणासुदीच्या गरजांसाठी केला जावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.संघटनेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दिव्यांग बांधव दिवाळीसारखा मोठा सण आनंदाने साजरा करू शकतील, यासाठी नगर परिषदेने संवेदनशील निर्णय घेऊन निधीचे वाटप करावे. दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी आणि समाजात समरसतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आवश्यक आहे.”तसेच, काक्रंबा येथील एका दिव्यांग व्यक्तीवर झालेल्या मारहाणीप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याबद्दल संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ही दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी, सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी सातत्याने कार्यरत आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव असलेला निधी प्रत्यक्ष गरजू दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचा आग्रह संघटनेने पुन्हा एकदा नगर परिषदेपुढे धरला आहे.संघटनेने नगर प्रशासनाला आवाहन केले आहे की, पात्र UDID प्रमाणपत्र धारक सर्व दिव्यांग नागरिकांना दिवाळीपूर्वी निधीचे वाटप करण्यात यावे, जेणेकरून दिव्यांग बांधवांसाठीही दिवाळीचा सण “खऱ्या अर्थाने गोड” ठरेल.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, शहराध्यक्ष जमीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहर उपाध्यक्ष मेहबूब तांबोळी, तालुका उपाध्यक्ष तानाजी मगर, संजय शिंदे, सचिन जाधव, सिरीश फलटणकर, राजेश भिसे, बालाजी तांबे यांच्यासह धाराशिव शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.संघटनेने इशारा दिला आहे की, दिव्यांग निधीचा अपव्यय किंवा विलंब सहन केला जाणार नाही, आणि आवश्यक ती कारवाई न झाल्यास संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
