
तुळजापूर (दि. ८ ऑक्टोबर २०२५)तुळजापूर तालुक्यातील काकरंबा (देवगुंडे) येथील ४५% दिव्यांग असलेल्या श्री. हनुमंत देवगुंडे या दिव्यांग नागरिकावर गावातील काही समाजकंटकांनी निर्दयी मारहाण करून “जिवे मारण्याची धमकी” दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली असून, प्रहार दिव्यांग संघटनेने पोलिस अधीक्षक कार्यालयात धडक देत न्यायाची मागणी करणारे निवेदन सादर केले.या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मयुर काकडे, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, जिल्हासचिव महादेव चोपदार, उपाध्यक्ष महेश माळी, शहराध्यक्ष जमीर शेख, पदाधिकारी रवी शित्रे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेने निवेदनात म्हटले आहे की,> “दिव्यांग व्यक्तींवर सतत होत असलेल्या अन्याय, मारहाण आणि धमक्यांना आळा बसला पाहिजे. हनुमंत देवगुंडे यांच्यावर झालेला हा प्रकार हा केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण दिव्यांग समाजाच्या सन्मानावर घाला आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास संघटना तीव्र आंदोलनाचा इशारा देते.”या घटनेचा व्हिडिओ पुरावा संघटनेकडे असून, पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतरही कारवाई न झाल्याबद्दल संघटनेने पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.पोलिस अधीक्षकांनी निवेदन स्वीकृत करत चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रहार दिव्यांग संघटनेने इशारा दिला आहे की,> “दोषींवर त्वरीत गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
