भारतीय आयुर्वेद संशोधनाला आंतरराष्ट्रीय मंचावर मान्यता

पुणे, १० जुलै २०२५:पुणेच्या डॉ. रिंकू कविता संतोष भळगट यांना इंग्लंड येथील नामवंत ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या ‘फ्रीलान्स १०१’ या प्रतिष्ठित शिष्यवृत्तीचा सन्मान प्राप्त झाला आहे. परिधान आणि व्यक्तीच्या प्रकृतीचा परस्पर संबंध या विषयावरील त्यांचा अभिनव शोधनिबंध विद्यापीठात सादर करण्यात आला असून, त्याला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे.ही शिष्यवृत्ती केवळ व्यक्तिगत यशाचे प्रतीक नसून, भारतीय आयुर्वेदशास्त्र व पारंपरिक जीवनशैली यांना जागतिक आरोग्यविषयक चर्चेत महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देणारी ठरत आहे. याप्रसंगी डॉ. भळगट यांनी सांगितले की, “भारतीय आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून, संपूर्ण जगासाठी एक दिशादर्शक विज्ञान आहे.”डॉ. रिंकू भळगट यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी पुण्यातील भारती विद्यापीठ येथून प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठ येथे मार्केटिंग व ब्रँड मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात ट्रान्सपर्सनल सायकॉलॉजी आणि सायकॉलॉजी ऑफ ॲडिक्शन या क्षेत्रांमध्ये संशोधन करत आहेत.या मान्यतेबद्दल त्यांचे वडील श्री. संतोष भळगट व आई सौ. कविता भळगट यांचे देखील सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. स्कॉलरशिपच्या स्वरूपात त्यांना दीड लाख रुपये पारितोषिक देण्यात आले आहे.या यशामुळे भारतीय वैद्यकशास्त्राला जागतिक पातळीवर नव्याने प्रतिष्ठा लाभण्याची आशा व्यक्त केली जात आहे.