14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती धाराशिव संघटनेतर्फे उग्र आंदोलन

शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग, महिला व अन्य वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे दिनांक 08 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु शासनाने या आंदोलनातील रास्त मागण्यांकडे अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही.

या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने 14 जून 2025 रोजी, शनिवार या दिवशी संपूर्ण राज्यभरातील जिल्हा मुख्यालयांवर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामार्फत शासनाचे लक्ष वेधून, बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला बळकटी देण्याचा आमचा उद्देश आहे.हे आंदोलन पूर्णतः शांततेत, लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत पार पाडले जाईल. प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा व सहकार्य करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.धाराशिव जिल्ह्यातील या आंदोलनाला प्रहार दिव्यांग क्रांती संघटना,

धाराशिव जिल्हा ठामपणे पाठिंबा दर्शवते. जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राबवले जाणार आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना सादर करण्यात आले असून, त्यावर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महादेव चोपदार, महेश माळी, जमीर शेख, दत्ता पवार,सुधाकर मनाळे ,रवींद्र दागट,शिवाजी खडके आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.या आंदोलनात सर्व दिव्यांग, कार्यकर्ते, शेतकरी व वंचित घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.