निलेश व पुष्पा यांच्या विवाह सोहळ्याने दिला अनुकरणीय संदेश

चंद्रपूर, – आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे विवाह. बहुतेक वेळा हा क्षण भव्य, देखण्या सोहळ्यांनी साजरा होतो. पण काही माणसं आपला आनंद इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी वापरतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी पुढाकार घेतात. असाच एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी विवाह सोहळा चंद्रपूरमध्ये पार पडला, ज्याने उपस्थित प्रत्येकाच्या मनात आदर आणि अभिमानाची भावना निर्माण केली.दिव्यांग कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणारे निलेश पाझारे आणि सामाजिक जाणीव असलेल्या पुष्पा सावसागडे यांचा विवाह हा केवळ दोन मनांचा मिलन नव्हता, तर तो संवेदनशीलतेचा, समाजसेवेचा आणि जबाबदारीचा एक पवित्र दस्तऐवज ठरला.

कोणत्याही प्रथागत थाटटमाटाला फाटा देत, नोंदणी पद्धतीने झालेल्या या विवाहानंतर नवदांपत्याने एक अद्वितीय उपक्रम हाती घेतला — दिव्यांग बांधवांना स्वयंचलित वाहन, अंधांसाठी स्मार्ट काठी, श्रवणयंत्र, कुबड्यांचे वाटप, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागाला व्हीलचेअर भेट देण्यात आली.या सोहळ्यात एक वेगळाच भावनिक क्षण अनुभवायला मिळाला — जेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात नजाकतीचे अश्रू तरळले आणि टाळ्यांच्या गजरात समाजसेवक दांपत्याचा सन्मान झाला. याच प्रसंगी उपस्थितांना शासकीय योजनांची माहिती देण्याचे उपयुक्त कार्यही पार पडले. समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके आणि डॉ. कविश्वरी कुंभळकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेसह विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.निलेश पाझारे स्वतः एक दिव्यांग असून, गेल्या अनेक वर्षांपासून ‘दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी’च्या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत.

सामाजिक चळवळीतील त्यांचे योगदान हेच त्यांच्या कार्याची ओळख आहे. त्यांच्या सोबत जीवनप्रवास सुरू करणाऱ्या पुष्पा यांचेही सामाजिक भान आणि समर्पण भावी वाटचालीस निश्चितच बळकटी देणारे आहे.हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी एक संदेश होता – “खरे सौंदर्य झगमगाटात नसते, तर संवेदनशीलतेत असते. खरे वैभव खर्चात नाही, तर दिलेल्या मदतीत आणि पसरलेल्या हास्यात असते.”या विवाहाने चंद्रपूरच नव्हे तर समस्त समाजमनाला साद घातली आहे – ‘सुख म्हणजे देण्यात आहे’.