
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मे 2025 मध्ये उत्कर्ष मंडळ विलेपार्ले संचालित मूकध्वनि विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून पहिल्यांदाच तसेच मुंबईतील इतर सर्व कर्णबधिर शाळांमधून कु. ओंकार साळवी हा ९०.४० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला आहे. तर कु. प्रथम चारी ८७.४०% गुण मिळवून दुसरा आला आहे. विद्यालयातून एकूण दहा विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी 80% च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. कौतुकास्पद विशेष बाब म्हणजे ही कर्णबधिर मुले इंग्रजी हा विषय घेऊन परीक्षेला बसली होती. या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळावे याकरिता त्यांच्या विशेष गरजेनुसार नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक होते. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील या मुलांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही. ही मुले कर्णबधिरत्वामुळे इतर सर्वसामान्य मुलांच्या ट्युशनला जाऊन अभ्यास करू शकत नाहीत. अशावेळी या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची जबाबदारी वर्गशिक्षिका श्रीमती शीतल सावंत यांनी स्वीकारून गेल्या वर्षी मेमध्ये मुलांसाठी अभ्यासाचे तंत्र व कौशल्य यावर एक उपक्रम घेतला. यात मुलांनी शालांत परीक्षेच्या यशाचे ध्येय आखले. ध्येयाचे चार्ट बनवून घरात भिंतीवर लावले. वेळेचे नियोजन करीत अभ्यासाचे वेळापत्रक बनवले. घरी अभ्यासासाठी शांत वातावरण नसल्याने रात्री जागून अभ्यास करणे, सकाळी लवकर उठून अभ्यास करणे, ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी स्वयंशिस्त निर्धार, जिद्द, मेहनत करण्याची तयारी, दूरदर्शन, मोबाईलचा वापर यावर संयम ठेवणे आदी गुण अंगीकारले. या उपक्रमात मुलांनी आत्मसात केलेल्या या गोष्टींचा पाठपुरावा वर्षभर घेण्यात आला.

पालक सभा घेऊन त्यांचे सहकार्य मिळवले. कर्णबधीरत्वामुळे या मुलांकडे भाषेची मर्यादा असते. त्यांना इतिहास, भूगोल, मराठी या विषयांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाठ करणे कठीण जाते. त्यामुळे प्रत्येक धड्याखालील सविस्तर सविस्तर उत्तरे मुलांना पाठ करता येतील अशा सोप्या भाषेत मुद्देसूदपणे लिहून दिली गेली. प्रत्येक पाठ शिकून झाल्यावर त्यावर लगेच सराव परीक्षा घेतली गेली. त्यामुळे मुलांचा नियमित अभ्यास होत गेला. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी वर्षभर शिस्तबद्ध प्रयत्नपूर्वक केलेल्या मेहनतीमुळेच हे उज्वल यश मिळविल्याचा आनंद सर्वांना झाला. या यशामध्ये वर्गशिक्षिका श्रीमती शीतल सावंत यांच्यासोबत इंग्रजी विषय शिक्षिका श्रीमती समीक्षा बाक्कर तसेच चित्रकला शिक्षिका श्रीमती हिमाली साळवी व श्रीमती स्वाती भावे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा गांधी, श्रीमती वृषाली थिटे यांचा मोलाचा वाटा आहे. याचबरोबर उत्कर्ष मंडळ विलेपार्ले संस्थेतर्फे मुलांना कायम मिळालेल्या शैक्षणिक मदतीचा उल्लेखनीय हातभार लागला आहे. उत्कर्ष मंडळ विलेपार्ले संचलित मूकध्वनि विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल हार्दिक अभिनंदन..