समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यकजिल्हा माहिती अधिकारी खडसे यांचे प्रतिपादन

Spread the love

जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात
धाराशिव: समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक आहे. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार सजग राहून समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कार्यरथ रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार (दर्पण) दिनानिमित्त सोमवारी (दि.६) धाराशिव येथे आयोजित प्रतिमा पूजन व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. खडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर संघाचे सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, सरचिटणीस संतोष जाधव, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे म्हणाले, बदलत्या काळनुसार आता अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कृत्रिम बुध्दीमत्तेचा देखील वापर होत आहे.त्यातून उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे पत्रकारिता देखील विस्तारत आहे. निती आयोगाच्या मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिवसह राज्यातील ४ जिल्ह्याचा समावेश आहे. हे मागासलेपण पुसण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा. शासन समाजासाठी विविध योजना राबविते. पत्रकारांनी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता करून समाजातील वातावरण शांत व चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावेत. चुकीच्या गोष्टी समाजासमोर मांडाव्यात. आपली आदर्श पत्रकारिता लोकांसह शासनापर्यंत पोहचवावी. वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करीत असताना आपण कोणतीही माहिती बरोबर आहे का याची खातरजमा करावी. विकासात्मक पत्रकारीतेला कृत्रिम बुद्धीमत्तेची जोड देणे अवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री. खडसे यांनी केले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष श्री. हंबीरे, सुत्रसंचालन पत्रकार भैरवनाथ कानडे तर आभार प्रदर्शन संघाचे सहसरचिटणीस श्री वैद्य यांनी केले. कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष सुभाष कदम (धाराशिव), सुरेश घाडगे (परंडा), प्रमोद कांबळे (भूम), गौतम चेडे (वाशी), इक्बाल मुल्ला (लोहारा), जिल्हा संघटक संतोष शेटे, प्रवीण पवार, उपेंद्र कटके, प्रशांत कावरे, राहुल कोरे, सुरेश कदम, प्रा. सतीन मातणे, सुरेश कदम, शरद गायकवाड, प्रशांत गुंडाळे, पत्रकार अशोक दुबे, निजाम शेख, बालाजी लोखंडे, आदम पठाण, रामचंद्र गायकवाड, श्री.वाघमारे, मोहसीन पठाण, शाहरूख सय्यद आदींसह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

अनंत भालेराव स्मृती पुरस्काराचे लवकरच वितरण
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. रणदिवे म्हणाले, मराठवाड्यात पहिले पत्रकार भवन उभारण्याचा मान धाराशिव येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाला मिळाला आहे. संघाची विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्याची परंपरा आहे. संघाच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडास्तरीय अनंत भालेराव स्मृती पुरस्कार वितरण सोहळा लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button