
धाराशिव – शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर, विनापरवाना, विनाकागदपत्र आणि स्क्रॅप स्थितीतील ऑटोरिक्षांचा सुळसुळाट वाढलेला आहे. यामुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून, अनेक वेळा या वाहनांचा वापर गुन्हेगारी कारवायांमध्ये होत असल्याचे आढळून आले आहे.

परवानाधारक, कायदेशीर नियमांचे पालन करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक-मालकांवर अन्याय होतो आहे. शासनाला नियमित महसूल भरूनदेखील या प्रामाणिक चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे बेकायदेशीर रिक्षांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.दि. 12/07/2024 रोजी यासंदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेला निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत, ही बाब खेदजनक आहे. त्यामुळे कायदेशीर चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शिवराज्याभिषेक रिक्षा समितीने वाहतूक नियंत्रण शाखा, धाराशिव यांना 8 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत जर संबंधित बेकायदेशीर ऑटोरिक्षांवर कारवाई झाली नाही, तर संपूर्ण परवानाधारक ऑटोरिक्षा चालक-मालक वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. या आशयाचे निवेदन श्री. योगेश अतकरे,कार्याध्यक्ष,शिवराज्याभिषेक रिक्षा समिती, धाराशिव यांनी दिले आहे यावेळी समितीचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते