तहसीलदारांच्या सत्कारावरून पालकमंत्र्यांवर टीका – “जनतेच्या भावनेचा विचार व्हायला हवा होता” – मनोज जाधव

Spread the love

आज देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर धाराशिवचे तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांचा सत्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत हा प्रकार जनतेच्या भावनेला धक्का देणारा असल्याचे म्हटले आहे.मनोज जाधव यांनी सांगितले की, फक्त आठ दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव दौऱ्यावर आले असता, त्यांच्या जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी या तहसीलदार मृणाल जाधव यांच्याविरोधातच आल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या तक्रारी ऐकून त्यावर योग्य न्याय देण्याऐवजी विविध प्रकरणांत अनियमितता झाल्याचे आरोप वारंवार झाले आहेत.विशेषतः, एन. ए. लेआउट प्रकरणांमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. या प्रश्नानंतर महसूल मंत्र्यांनी चौकशीसाठी ॲडिशनल कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, प्रथमदर्शनी तहसीलदार दोषी असल्याचेही नमूद केले आहे. याशिवाय, एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मृणाल जाधव यांच्यावर शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप केला असून, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर, अशा गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सोहळ्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून सत्कार करण्यात येणे हा प्रकार चुकीचा असल्याचे मनोज जाधव यांनी स्पष्ट केले. “हा सन्मान म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे असून, भविष्यात अजून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यासच प्रेरणा देणारा प्रकार आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.मनोज जाधव यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता या सत्कार प्रकरणावर पालकमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button